Loknete Gopinathrao Munde
Details
गोपीनाथ पांडुरंग मुंडे (१२ डिसेंबर १९४९ – ३ जून २०१४) हे मराठी, भारतीय राजकारणी होते.त्यांनी इ.स. २००९ पासून भारताच्या लोकसभेत बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ते इ.स. २०१४ मधे भारत सरकार चे केंद्रीय ग्राम-विकास मंत्री होते तसेच इ.स. २०१२ भारतीय जनता पक्षाचे (भाजप) लोकसभेतील उपनेते होते व १४ मार्च इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री होते. ३ जून २०१४ रोजी गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत अपघाती निधन झाले.दिल्लीहून परळीत आयोजित असलेल्या विजयी रैलीसाठी जात असताना मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आणि या दुर्घटनेत त्यांचे आकस्मिक निधन झाले. १९७८ मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावले. १९८0मध्ये ते पहिल्यांदा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर १९९0 आणि १९९५मध्येदेखील याच मतदारसंघातून ते निवडून आले.१९८0 ते ८२ दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद, व त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद भूषविले. राज्यात युतीची सत्ता असताना त्यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. तर २00९मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. भाजपचे सभेला गर्दी खेचणारे वक्ते व जनपाठिंबा असलेले महाराष्ट्र राज्यातील नेते म्हणून त्यांची ओळख होती.महाराष्ट्राच्या राजकारणात ते एक प्रबळ राजकीय पुढारी समजले जायचे.त्यांना भाजपमधील ग्रासरूट लेव्हलला काम करणारा नेता असे म्हटले जायचे. राष्ट्रीय पातळीवरही भाजपमध्ये नेते म्हणून गोपीनाथ मुंडेची चांगली ओळख होती. मुंडेसोबत महाराष्ट्र राज्यातील भाजप आमदारांची मोठी फळी होती.
गोपीनाथ मुंडे हे मूळचे मराठवाड्यातील . त्यांचे घराणे राजकीय नसल्याने त्यांना घरून कुठलाही राजकारणाचा वारसा नव्हता. संघर्ष करीत ते लोकसभेचे सदस्य झाले. तथाकथित उच्चवर्गीयांपुरत्या मर्यादित असलेल्या भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम मुंडे यांनी केले.१२ डिसेंबर, इ.स. २०१० रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा गौरव लोकनेता (लोकनायक) असा केला होता.लोकसंपर्क, अन्यायाविरुद्ध संघर्षाची नुसतीच तयारी नव्हे तर जिद्द, नवा विचार, नवे तंत्रज्ञान एकूणच जे नवे चांगले ते हवे, असा उत्साह असलेल्या गोपीनाथ मुंडे या तरुणाने भाजपला जनमानसात स्थान मिळवून दिले आणि विशेषतः उपेक्षित-शोषित वर्गात एक विश्वास निर्माण केला, असे समजले जाते. त्यांना राजकारणातील अनपेक्षितपणा, अपयश आणि जीवघेणी स्पर्धा याचा सामना करावा लागला. या संघर्षमय पार्श्वभूमीमुळे गोपीनाथ मुंडे मराठवाड्याच्या सीमा ओलांडून मुंबईत गेले. या बळावरच ते राष्ट्रीय नेतेपदापर्यंत पोहोचले. रूढार्थाने महाराष्ट्राची भूमी भाजप चळवळीस फारशी अनुकूल नसताना राज्यात भाजपचा झेंडा सातत्याने फडकवीत ठेवणारे आणि एकूणच सिंहाचा वाटा उचलणारे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हा भाजप चळवळीस जनसमर्थनासाठी झुंजत होता. राजकीयदृष्ट्या असपृश्य समजल्या जाणाऱ्या भाजपला जनाधार मिळवून देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. याच आव्हानाचा पाठलाग करताना आणि थेट देशाच्या राजधानीत बस्तान मांडले आणि भारताच्या सीमा ओलांडून ते संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर पोहोचले. संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचेज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे भूमिपुत्र गोपीनाथ मुंडे उभे होते. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत सुप्रतिष्ठित व्यासपीठावर आपले विचार मांडायची संधी त्यांना मिळाली. एकसष्टीच्या पूर्वसंध्येला ही संधी देऊन महाराष्ट्राच्या मराठवाड्यासारख्या एका मागासलेल्या प्रदेशातल्या, बीडजिल्ह्यातल्या, परळी तालुक्यातल्या नाथ्रा गावातल्या गोपीनाथ मुंडे नावाच्या नेत्याचा भारत सरकारनेही त्यांच्या चार दशकांच्या राजकीय तपश्चर्येचा सन्मान केला.
व्यक्तिगत आयुष्य.
गोपीनाथ मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील नाथ्रा या गावी ता. परळी, जि. बीड एका सामान्य शेतकरी कुटुंबात १२ डिसेंबर, इ.स. १९४९ रोजी वडील पांडुरंगराव आणि आई लिंबाबाई मुंडे यांच्या घरी झाला. मुंडे कुटुंब पंढरपूरच्या वारीत अनेक वर्षे सहभागी होते. अखंड वारी करणारे वडील पांडुरंगराव आणि आई लिंबाबाई मुंडेंच्या प्रभावाने गोपीनाथ मुंडे यांनी वयाच्या १४ व्या वर्षी पंढरपूरची वारी चालत जाऊन केली. त्यानंतर सात वर्षे वारी केली. मराठवाड्यात त्या वेळी श्रीक्षेत्र भगवानगडचे महंत श्री संत भगवानबाबा गडकर महाराज यांच्या आध्यात्म्याचा बोलबाला होता. आई-वडीलभगवानबाबांचे कीर्तन ऐकण्यास गोपीनाथलाही घेऊन जात. हे सर्व ऐकून मुंडेंच्या मनावर आध्यात्मिक परिणाम झाला.
त्यांच्या घरात बेताची परिस्थिती होती. इ.स. १९६९ मध्ये पांडुरंगरावांचे अकाली निधन झाले, पण त्यांच्या आई व गोपीनाथ मुंडे यांचे थोरले बंधू पंडितअण्णा मुंडेने गोपीनाथ मुंडे यांचे शिक्षण पूर्ण केले. गोपीनाथ मुंडे यांचे धाकटे भाऊ व्यंकट मुंडे हे आहेत. २१ मे, इ.स. १९७८ला त्यांचे लग्न प्रमोद महाजनांच्या भगिनी प्रज्ञा महाजन यांच्याशी आंबेजोगाईला झाले. गोपीनाथ मुंडे यांना पंकजा पालवे-मुंडे, प्रीतम खाडे-मुंडे आणि यशश्री मुंडे या तीन मुली आहेत.
विद्यार्थी जीवन
गोपीनाथ मुंडे यांचे आरंभीचे शिक्षण जिल्हापरिषदेच्या शाळेत तर बी. कॉम. पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण आंबेजोगाई येथे झाले. गोपीनाथ मुंडे इ.स. १९६९ मध्ये आंबेजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात होते. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते पुढील शिक्षणासाठी पुण्याला गेले. मुंडे पदवीचे शिक्षण घेत असताना बी. के. सबनीस हे स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य होते. सबनीस सर हे समाजवादी विचारांचे होते. त्यांचे विद्यार्थी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यावर संघाच्या विचारांचा प्रभाव होता. मुंडे यांना सबनीसांचा आदर होता. संघाच्या विचारांचा प्रभाव असूनही मुंडे यांनी इतर मतांबद्दल दुराग्रह ठेवला नाही. मुंडेंनी चार दशकांपूर्वी बीडच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी संसदेच्या निवडणुका लढवून राजकारणाचा श्रीगणेशा केला. कॉलेजात असतांना त्यांची प्रमोद महाजन यांच्याशी मैत्री झाली आणि त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली. कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आणि मुख्य म्हणजे कुठलेही आथिर्क पाठबळ नसताना मुंडेंनी कॉलेजच्या पहिल्या वर्षी वर्गप्रतिनिधीची म्हणजे ‘सीआर’ची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. प्रमोद महाजनच्या नेतृत्वाखाली हा त्यांचा राजकारणाचा पहिला अनुभव होता. गोपीनाथराव निवडणुकीत पडले, पण त्यांचा गट निवडून आला होता. बीडजिल्ह्यातल्या कॉलेज निवडणुकांवर प्रदीर्घ काळ वर्चस्व गाजवणाऱ्या एका ग्रुपला पाणी पाजण्यात मुंडे-महाजन गटाच्या मसलती यशस्वी ठरल्या होत्या. युतीच्या राजकारणाची ओळख समाजाला झाली आणि युतीच्या राजकारणाचे बीज पेरले गेले. गोपीनाथराव कॉलेजमधली पहिलीवहिली निवडणूक हरले; पण त्यामुळे त्यांच्या पुढच्या चळवळीच्या आणि आंदोलनांच्या राजकारणाला जशी कुठेच बाधा आली नाही. तशीच पुढच्या दहा वर्षांतच लढवलेल्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभव पदरी आल्यानंतरही त्यांच्या राजकारणाचा वारू कोणी रोखू शकले नाही. दरम्यानच्या काळात श्रीपती शास्त्री यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून गोपीनाथरावांना तावून -सुलाखून बाहेर काढले होते. त्याच काळात गोपीनाथरावांनी अखिल भारतीय विद्यार्थी चळवळीचा ओनामा जाणून घेतला होता. पुढे देशात आलेल्या आणीबाणीच्या विरोधातही मराठवाड्यातगोपीनाथराव, प्रमोद महाजन सातत्याने कार्यरत होते.
राजकीय कारकिर्द
प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या भाजपच्या बिनीच्या शिलेदारांनी तब्बल २५ वर्षांपूर्वी बीड या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनच निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला होता. मुंडे-महाजन या दोघांनी झंझावाती प्रचाराने उभा महाराष्ट्र ढवळून काढला होता. आधी जनसंघ आणि नंतर भाजपचा प्रचार करताना या दोघांनी पक्षाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घट्ट रूजविली होती. मुंडे-महाजन जोडगोळीने मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र अक्षरश: पिंजून काढला होता. जनसंघाच्या मिणमिणत्या पणतीपासून भाजपला राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे मोठे काम मुंडे-महाजन या जोडगोळीने केले. संघाच्या शिस्तबद्ध पठडीतून बाहेर निघून पक्षाला सर्वसमावेशक आणि देशव्यापी स्वरूप देण्यासाठी वसंतराव भागवतांनी या जोडगोळीला बळ दिले. एका अर्थाने सरंजामी नेतृत्वाला पर्याय म्हणून भागवतांनी मराठवाड्यामध्ये एक सक्षम पर्याय निर्माण केला. सुरुवातीपासून मतदारसंघावर लक्ष ठेवावं असं प्रमोद महाजनांचं म्हणणं होतं. त्यामुळे मुंडेचे लक्ष नेहमीच मराठवाडा आणि विशेषत: मतदारसंघावर असायचे. वयाच्या ऐन पंचविशीत इ.स. १९७० मध्ये परळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अ.भा.वि.प.) काम करीत असतानाच ते संघाच्या संपर्कात आले. त्यांचे कर्तृत्व बहरू लागले. अशातच मुंडेच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात इ.स. १९७८ साली बीडजिल्ह्यातून निवडणूक लढवून झाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.
१९७८ मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावले. १९८0 मध्ये ते पहिल्यांदा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर १९९0 आणि १९९५मध्येदेखील याच मतदारसंघातून ते निवडून आले.१९८0 ते ८२ दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद, व त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद भूषविले. राज्यात युतीची सत्ता असताना त्यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. तर २00९मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. मुंडे पहिल्याच प्रयत्नात इ.स. १९७८ च्या बीड जिल्हापरिषदेची निवडणुकीत उजनी मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आले. जिल्हापरिषदेच्या स्थानिक स्तरावरील राजकारणाशी त्यांचा फारच थोडा काळ संबंध आला. पण तेथे गिरवलेले धडेच त्यांना पुढे विधानसभा गाजवताना कामास आले. देशात आलेल्या आणीबाणीच्या विरोधातही मराठवाड्यातमुंडे-महाजन सातत्याने कार्यरत होते. त्यामुळेच आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पहिल्या विधानसभेची उमेदवारी त्यांना इ.स. १९७८ मध्ये मिळाली होती. तिथे नशिबाची साथ त्यांना मिळाली नाही. त्यावेळी काँग्रेस (इंदिरा) पक्षाचे १२ आमदार फोडून शरद पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पडले. १८ जुलै इ.स. १९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.पवारांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले १२ आमदार, काँग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले. शरद पवार यांच्याशी भाजपने युती केली आणि ‘पुलोद’चं सरकार आलं. इ.स. १९८० साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली आणि पुन्हा निवडणुका लागल्या. दोन वर्षांत आयती चालून आलेली संधी मात्र गोपीनाथरावांनी हातची निसटू दिली नाही. इ.स. १९८० सालातील महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत मुंडे आमदार म्हणून निवडून आले. बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातल्या नाथ्रा गावातला एक युवक थेट राज्याच्या सर्वोच्च सभागृहात जाऊन पोचला होता. केवळ आपल्या गावाचाच आवाज त्याला या सभागृहात पोचवायचा नव्हता तर मराठवाड्यासारख्या मागास भागातील दीनदुबळ्यांची दु:खे आणि व्यथा-वेदना त्याला तेथे पोचवायच्या होत्या. गोपीनाथरावांनी ते काम मोठ्या तडफेने पार पाडले आणि आमदारकीची धुरा सांभाळत असतानाच महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस म्हणून संघटनेचीही सूत्रं सांभाळली. जनसंघ ते भाजप अशी प्रमोद महाजन यांच्याबरोबरीने गोपीनाथ मुंडेंची वाटचाल झाली. बीड मतदारसंघात मोटरसायकलवरून गोपीनाथजींनी भाजपसाठी प्रचार केला. खांद्यावर शबनम आणि मोटरसायकल अशी गोपीनाथ मुंडेंची ओळख बनली होती. त्यावेळी भाजपचे १४ उमेदवार निवडून आले. पण पुढे दोन-अडीच वर्षांतच ‘जनता पार्टी’ फुटली आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) नावाचा नवा पक्ष जन्माला आला. या नव्या पक्षाकडे आपल्या युवक संघटनेची म्हणजेच ‘भारतीय जनता युवा मोर्च्या’च्या कारभाराची सूत्रे सोपवण्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे’ हा आदर्श पर्याय उभाच होता. वयाच्या ३५ व्या वर्षी इ.स. १९८० मध्ये भारतीय जनता युवा मोर्च्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांचे काम विस्तारत होते. पुढे इ.स. १९८२ मध्ये ते महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस झाले. इ.स. १९८५ मध्ये झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत पराभव झाला. मुंडे पुन्हा एकदा जनरल सेक्रेटरी झाले. इ.स. १९८० साली बीड जिल्ह्यातील रेनापुर मतदारसंघातून मुंडे यांनी विधानसभेत प्रवेश केला. परंतु इ.स. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंडे यांना रेनापुर मतदारसंघातच काँग्रेसचे पंडितराव दौंड यांनी अष्टरंगी सामन्यात पराभूत केले. इ.स. १९८५ मधील ही हार वगळता मुंडे यांच्यावर निवडणुकीच्या आखाड्यात धूळ खाण्याचा प्रसंग आला नाही.
‘गोपीनाथ मुंडे’ हे नाव आता साऱ्या महाराष्ट्राला ठाऊक झाले होते. बहुधा त्यामुळेच इ.स. १९८५ मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत गोपीनाथरावांचे सारे विरोधक एकत्र झाले आणि त्याची परिणती त्यांच्या पराभवात झाली. पण पराभवाने खचून जाण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. त्यांनी जिद्दीने पक्ष वाढवण्याचं काम हाती घेतलं आणि पुढच्याच वर्षी म्हणजे इ.स. १९८६ मध्ये महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष कोण होणार, असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा पक्षाचे एक अर्ध्वयू आणि मावळते अध्यक्ष उत्तमराव पाटील यांनी कौल दिला : ‘माझ्या गादीवर मुंडेच बसतील!’. ते अपयशाने खचले नाही. या दरम्यान त्यांचे वक्तृत्व, नेतृत्व अधिकच विकसित होत गेले. सातत्याने त्यांनी लोकांमध्ये मिसळून काम केले. सत्ता नसताना अनेक प्रश्न त्यांनी तडीस नेले. त्यांनी आपला मतदारवर्ग पक्षाच्या भिंती तोडून तयार केला. सर्व समाजातील मतदारांनी त्यांना स्वीकारले. म्हणून पक्षामध्ये ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांची संख्या मोठी असूनही दोन पिढ्यांना मागे सारत तरुण गोपीनाथजींची इ.स. १९८६ साली प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आणि येथूनच भाजपच्या वाटचालीला वेगळे वळण मिळाले. इ.स. १९८७ मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्रात कर्जमुक्ती मोर्चा काढून शासनास ‘कर्जमुक्ती’ करण्यास भाग पाडले. हा भाजपचा इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा मानला जातो. समाजातील अनेक आंदोलने गोपीनाथजीनी हातात घेतली आणि यातूनच पक्षाचा विस्तार सातत्याने होत गेला. या साऱ्या प्रवासात राजकीय गुरू वसंतराव भागवत होते. वसंतरावांनी तेव्हा लिहिलेले एक पत्र आजही गोपीनाथरावांच्या स्मरणात आहे. भागवतांनी त्या पत्रात अनेक मौलिक सूचना केल्या होत्या. त्यातील एक होती : ‘दौऱ्यावर कधीही हॉटेलात उतरायचे नाही, तर कार्यकर्त्याच्या घरीच मुक्काम करायचा…’ मुंडे हाताखालचे सरचिटणीसपद तेव्हा भागवत यांनी जाणीवपूर्वक स्वीकारले होते. याच पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्र भाजपचा चेहरामोहराच नव्हे तर स्वभावही बदलून टाकण्याचे काम मुंडे यांनी केले. त्यात धरमचंद चोरडिया यांच्यासारख्या उदारमतवादी कार्यकत्यांची त्यांना भक्कम साथ लाभली. धरम चोरडीया (मारवाडी), अण्णा डांगे (धनगर), मुंडे (वंजारी), ना. स. फरांदे (माळी) हे एकत्र आले. या सर्वांनी (माधवं) समाजाच्या तळागाळातील उपेक्षित वर्गांपर्यंत भाजपला पोहोचवण्याचे मोठे काम केले. ब्राह्मणी चेह-याच्या भाजपला मुंडे यांनी त्या प्रतिमेतून बाहेर काढून तळागाळापर्यंत पोहोचवतानाच आपल्याबरोबर विविध समाजघटकांतील नेत्यांची फळी उभी केली होती. आपण ओबीसी हा प्रभावशाली घटक जवळ करणे आवश्यक आहे हे वसंतराव भागवत वगैरेंनी जाणले. महाजनांच्या जोडीला मुंडेंना पुढे आणण्यात आले आणि मुंडे यांनी त्यांचा विश्वास सार्थ करून भाजपचा राजकीय पाया घातला.
इ.स. १९९०च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे थोडेथोडके नव्हे तर ४२ आमदार निवडून आले! हे श्रेय अर्थातच गोपीनाथरावांच्या दूरदृष्टीचं होते. इ.स. १९९२ ते इ.स. १९९५ या कालावधीत मुंडेंनी विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेतेपद सांभाळले. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवल्यानंतर मुंडे यांचा वारू महाराष्ट्रभर उधळला. विरोधी पक्षनेते असताना राजकारणाच्या गुन्हेगारीकरण विरोधात त्यांनी आवाज उठविला. अनेक प्रश्न अभ्यासपूर्ण पध्दतीने मांडून, विरोधी पक्षनेत्यांची स्वतंत्र प्रतिभा निर्माण केली. गोपीनाथजींनी त्यावेळी मुद्याचं राजकारण करण्यावर भर दिला. आरक्षण, मंडल आयोग, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी प्रश्न गांभीर्याने पाहिले. मुंडे यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केला तर इ.स. १९९० ते इ.स. १९९५ हा त्यांच्या जीवनातील सर्वोत्तम काळ होता. जवळपास त्यांनी एकट्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली होती आणि पवारांना जेरीस आणले. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा मुद्दा घेऊन संपूर्ण राज्यभर दौरा करीत शरद पवारयांच्याविरोधात रान उठविले होते. जे.जे. हत्याकांडातले आरोपी पवारांबरोबर विमानात होते, हे सिद्ध झाले. जळगावमधलं सेक्स स्कॅण्डलमध्ये केवळ मुंडे यांच्या आरोपानंतरच केस होऊ शकली. पप्पू कलानीने जमवलेल्या पैशाचा भ्रष्टाचारही उघडकीस आला. शरद पवारांनी राजकारणाचं गुन्हेगारीकरण केलं असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी म्हटले. राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा शब्दप्रयोगही तेव्हाच अस्तित्वात आला. शरद पवारांनी गुन्हेगारांना दिलेला आश्रय नेहमीच लोकांसमोर मांडला. त्यामुळे गोवारींचं हत्याकांड असो, वडराई प्रकरण असो, केवळ मुंडे यांनी त्याबाबत आवाज उठवल्यामुळेच ही प्रकरणं लोकांसमोर आली. त्यावर कारवाईही झाली ‘राजकारणाचं गुन्हेगारीकरण’ हा मुद्दा त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नेला. त्यावेळी गोपीनाथजीनी शिवनेरी ते शिवतीर्थ अशी काढलेली संघर्ष यात्रा प्रचंड गाजली. महाराष्ट्रात पहिल्यांदा काँग्रेसेतर राजकीय शक्ती सत्तेत येण्याचा चमत्कार नव्या समीकरणात इ.स. १९९५ साली घडला. इ.स. १९९५च्या विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित काँग्रेसच्या हातातून शिवसेना आणि भाजप युतीने राज्याची सत्ता खेचून घेतली. फेब्रुवारी-मार्च इ.स. १९९५ साली जे राजकीय परिवर्तन झाले त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या विरोधात राज्यभर काढलेली संघर्षयात्रेचा सिंहाचा वाटा होता. याच काळात त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात दौरे केले आणि शेतकरी, शेतमजूर यांना पक्षाच्या जवळ आणले. अवघ्या चाळीशीत, प्रभावशाली ग्रामीण नेता हा ठसा त्यांनी उमटवला.
१९९० च्या दशकांत मुंडे यांनी दाखवलेला झुंजारपणा हा इ.स.१९९५ साली भाजप आणि शिवसेना युतीची सत्ता येण्यात सिंहाचा वाटा बनला. विधानसभेच्या इ.स. १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकांत मुंडेंनी भाजपला अभूतपूर्व यश मिळवून दिले. गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार उघडलेली आघाडी यांचे प्रतिबिंब मतपेटीत उमटले. काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला. भाजप-शिवसेना युतीस २८८ पैकी १३८ जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास ८० जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या भाजप–सेनेच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले व राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांचा १४ मार्च इ.स. १९९५ रोजी शपथविधी झाला. इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांचा कुशल प्रशासक म्हणून नावलौकीक होता. त्यांनी महाराष्ट्रात ऊर्जा व गृह यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचीही जबाबदारी सांभाळली. गोपीनाथराव उपमुख्यमंत्री म्हणून अत्यंत यशस्वी झाले. राज्यातील लोकांच्या हिताचे प्रश्न मांडणारा तडफदार आमदार म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांनी गुन्हेगारीकरनावर अंकुश लावला. वीजनिर्मिती वाढविण्यावर भर दिला. सर्व खात्यांना मार्गदर्शन करून, रचनात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता दाखवली आहे. प्रशासन पध्दतीवर त्यांनी एक वेगळी छाप पाडली आहे. तसेच सरकार समोरील समस्यांचे समाधान करण्यात त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे. मुंडे यांनी प्रशासनावर चांगली पकड बसवली आहे. उत्कृष्ट प्रशासक होण्यासाठी समस्यांचा अभ्यास, स्वतःचे मत, प्रशासकीय यंत्रणेवारील पकड, योजनेच्या अमलबजावणीतील उणीवा दूर करणे, लाभार्थीशी संपर्कसाधने, योजनेच्या अमलबजावणीसाठी साधनांची जुळवाजुळव करून ती योजना यशस्वीरित्या राबविणे याबाबत गोपीनाथ मुंडे यशस्वी झाले आहेत. हे उपमुख्यमंत्रिपद सर्वार्थाने गाजवले आणि युतीचे सरकार गेल्यावरही ते जिद्दीने काम करत राहिले. इ.स.२००९ च्या ऑक्टोबर महिन्यातील निवडणूक त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून लढवली. बीड लोकसभा मतदारसंघातून म्हणून निवडून येताना भाजपचे आमदार गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश कोकाटे यांना १ लाख ४० हजार ९५२ मतांनी पराभव केला होता. बीड लोकसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा पालवे निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या होत्या. त्यांनी ओट्यावर, बाजेवर, चावडीत जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. ३०० गावांमध्ये सभा आणि ४०० गावांना भेटी दिल्या. यामधून त्यांनी आपले नेतृत्वगुण सिद्घ केले. मुख्य म्हणजे गोपीनाथरावांचे जे जे कट्टर विरोधक होते त्यांच्या घरी जाऊन ‘काका मी आता आलीय’ असे सांगून अनेक ठिकाणी कटुता मिटविण्याचा प्रयत्न केला. बीडमधील मतदार पंकजालाच गोपीनाथरावांची राजकीय वारस मानू लागले.
गोपीनाथरावांच्या यशात ‘वुमन ऑफ द मॅच’ म्हणून पंकजा पालवे-मुंडेंचा उल्लेख केलाच पाहिजे. महाराष्ट्र गाजवणारा नेता राष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहचला होता. महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पाडतील असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके मोजके नेते असतील. त्यात गोपीनाथ मुंडे ठळकपणे उठून दिसायचे. आपल्या 35-40 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत अनेक चढउतार अनुभवलेल्या या नेत्याने राजकारणात आपले स्वतःचे असे विशेष स्थान निर्माण केले. भारतीय युवा मोर्चातून राजकीय कारकीर्दीला प्रारंभ झालेला हा नेता देशाच्या संसदेतील विरोधी पक्ष उपनेता या पदावर यशस्वीपणे काम करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत होता, ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद अशी बाब होती. भारतीय जनता पक्षासारख्या हिंदुत्ववादी पक्षाचे नेते असूनही त्यांची प्रतिमा अत्यंत पुरोगामी आणि सर्वसमावेशक राहिली. महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण आणि सामाजिक भान ठेवून त्यांनी आपले काम सुरू ठेवले. राज्यासमोरील प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि त्यासाठी अथक मेहनत घेण्याची तयारी तसेच प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची धडाडी, याचबरोबर कार्यकत्र्यांचे आणि लोकांचे संघटन करण्याचे कौशल्य, संसदीय कामकाजाचा गाढा अभ्यास, अत्यंत प्रभावी वक्तृत्व आणि कर्तत्व असे सर्वगुणसंपन्न नेतृत्व भारतीय जनता पक्षाला लाभले, हे त्या पक्षाचे भाग्य तर होतेच; पण महाराष्ट्राचेही भाग्य होते, असेच म्हणावे लागेल. प्रमोद महाजन यांच्या मृत्यूनंतर सर्व साथींना त्यांनी आधार दिला. प्रमोद महाजन यांचे सच्चे साथी गोपीनाथ मुंडे हे दोघेही बीड जिल्ह्यातील होते तरीसुद्धा ते महाराष्ट्राशी एकरूप झाले होते. आणीबाणीनंतर गोपीनाथ मुंडे यांनी मराठवाडातून निवडणूक लढवली होती.
संसदीय लोकशाही अधिक मजबूत करायची असेल तर विरोधी पक्षनेता हा अत्यंत प्रभावी आणि अभ्यासू असण्याची गरज आहे. ते सर्व गुण गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये असल्यामुळेच अनेक प्रश्नांना चांगला न्याय मिळाला. शरद पवारांप्रमाणे पक्ष बदल करून आपल्या कर्तबगारीच्या जोरावर त्यांना मोठे होता आले असते; पण प्रत्येक वेळी आलेली संधी डावलून त्यांनी पक्षनिष्ठा महत्त्वाची मानली. नारायण राणे यांच्याप्रमाणे मुंडे यांनाही कॉँग्रेस पक्षाने अनेकदा खेचून घेण्याचे प्रयत्न केले. मोठमोठय़ा पदांचे गाजर त्यांना दाखवले. पण मुंडेंनी पक्षनिष्ठेला अधिक महत्त्व दिले. प्रमोद महाजन यांचा मुंडेंना चांगला पाठिंबा होता. त्यांच्या निधनानंतर मुंडेंचा प्रभाव कमी होईल, असे त्यांच्या विरोधकांना वाटत होते; परंतु कोणत्याही संकटावर मात करून पुढे जाण्याचा निर्धार असल्यामुळे त्यांचे महत्त्व कमी होऊ शकले नाही. शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आणण्याकरिता मुंडेंनी अथक परिश्रम केले. तत्कालीन कॉँग्रेसचे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील सरकार खाली खेचण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर जे रान उठवले, त्याला सीमा नव्हती. राज्यभर संघर्ष यात्रा काढून या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून त्यांनी पवार सरकारविरुद्ध वातावरण निर्माण केले. या सरकारच्या कार्यकाळात राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे, असे सप्रमाण सिद्ध करून त्यांनी ते सरकार खाली खेचण्यासाठी संपूर्ण ताकद लावली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे हे दोन नेते पवार सरकारवर तुटून पडले होते. त्या वेळी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपायुक्त गो. रा. खैरनार यांनी राजकारणात गुन्हेगारीकरण होत असल्याचे घणाघाती आरोप सुरू केले होते. वातावरण निर्मिती होऊ लागली होती. हा विरोध वाढवण्याचे यशस्वी काम ठाकरे-मुंडे यांनी केले. शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आणण्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा फार मोठा वाटा होता. त्याचे फळही त्यांना मिळाले. ते राज्याचे उपुमख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले ते केवळ त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर. गृहमंत्रीपदी त्यांनी आपली ताकद दाखवली. त्यांच्यासारखा कर्तृत्ववान आणि ताकदवान गृहमंत्री आजतागायत पुन्हा महाराष्ट्राला लाभलेला नाही. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुंबईतील टोळीयुद्ध नष्ट केले. गुंड टोळय़ांचे कर्दनकाळ अशी त्यांची प्रतिमा बनली होती. तत्कालीन मुख्यमंत्री यांनी त्यांना दाबून टाकण्याची एकही संधी सोडली नाही; परंतु त्यांनी सरकारवरचा आपला प्रभाव कायम ठेवला. शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यावर हल्लाबोल करून त्यांनी युतीची सत्ता मिळवली होती, हे विशेष. विधानसभेत केवळ दोन-पाच जागा मिळवणाऱ्या भाजपाला बेरजेचे राजकारण करून त्यांनी 56 वर नेऊन ठेवले.
गोपीनाथ मुंडेंनी केवळ राजकारणच केले नाही, तर विधायक कामातही ते सरस ठरले होते. त्यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. सहकारी साखर कारखान्यांबरोबरच खाजगी साखर कारखानेही त्यांनी काढले आणि यशस्वीरीत्या चालवूनही दाखवले आहेत. राज्याच्या राजकारणात त्यांनी मराठवाडा आणि बीड जिल्ह्याला अधिक प्राधान्य दिले होते. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत ते सक्रिय सहभागी झाले होते. त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. मराठवाडय़ातील प्रत्येक आंदोलनामध्ये विद्यार्थी चळवळीपासूनच भाग घेतला होता. मराठवाडय़ाच्या हितासाठी मित्रपक्ष शिवसेनेवरही त्यांनी हल्ला केला होता; परंतु प्रमोद महाजनांनंतर शिवसेनेशी युती कायम ठेवण्यासाठी त्यांनीच मध्यस्थाची भूमिकाही स्वीकारली होती. युतीच्या राजकारणात जे काम महाजन करत असत ते मुंडेंनी यशस्वीपणे पार पाडले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांनी स्नेहसंबंध प्रस्थापित केले होते. राजकीय प्रगल्भता दाखवण्याबरोबरच विधायक कामावर भर दिल्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे आणि राजकारणातील प्रभावी नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा आपोआपच बनली होती. गोपीनाथ मुंडेचे नेतृत्व हे साडेचार दशक राजकारणात घातल्यानंतर उभे राहिलेले आहे. आज मुंडे ज्या पातळीवर आहेत त्या पातळीवर जायला प्रत्येक नेत्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. किंबहुना ही प्रतिमा निर्माण करण्यासाठी एक मोठा काळ जावा लागतो. देशाला स्वातंर्त्य मिळून अजून सत्तर वर्षे काळात महाराष्ट्रातून फक्त पाच नावे गेलीत जी पंतप्रधान पदाच्या जवळपर्यंत पोहोचत होती. ही वास्तविकता लक्षात घ्यायला हवी. गोपीनाथ मुंडेचा कौतुक करण्यासाठी नाही तर अर्धे आयुष्य राजकारणात घातल्यानंतर या प्रदेशाची अस्मिता देशपातळीवर चमकली आणि त्यासाठी याच प्रदेशातून प्रयत्न झाले आहे.
संघर्ष
संघर्ष यात्रेच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडेची राजकीय कारकिर्द झळाळून आली.युती सरकारच्या काळात 1995 ते 1999 हा उपमुख्यमंत्रीपदाचा काळ सोडला तर मुंडेंना सत्तेच्या बाहेर राहूनच संघर्ष करावा लागलेला आहे. त्यामुळे या संघर्षाच्या स्थितीतही मुंडे एक ताकदवान नेता म्हणून कायमच उभे राहिले. गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष हा सगळय़ाच पातळीवर राहिला आहे. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगला. भाजपाच्या आंदोलनात काठय़ाही खाल्ल्या. ओबीसी नेतृत्व असल्यामुळे अनेकवेळा खच्चीकरणाचे प्रयत्नही झाले. पुढे-पुढे हा संघर्ष कौटुंबिक पातळीवरदेखील उतरला; पण या सगळय़ांना टक्कर देत मुंडे उभेच होते.सत्तेची ऊब मिळावी म्हणून पक्षांतर करण्याइतके ते तकलादू नेते बनले नाहीत. क्षणिक लाभासाठी त्यांनी विचारांशी तडजोड केली नाही. भारतीय जनता पार्टीत जन्मलेले मुंडे, भारतीय जनता पार्टीशीच प्रामाणिक राहिले आणि आपल्या ताकदीवर भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्न केले. कितीही संकटे आली, वादळे आली तरी त्यांनी आपली वाटचाल तशीच ठेवली. साखर आणि सहकार या क्षेत्रात तर त्यांनी नवे पायंडेच पाडले आहेत. त्यांच्या नेतृत्वात चालणार्या वैद्यनाथ साखर कारखान्याने सगळेच उच्चांक मोडीत काढले. ज्या बीड जिल्ह्यातील साखर कारखानदारी मोडीत निघत होती, त्याच जिल्ह्यात पूर्णत नफ्यात आणि कमी खर्चात हा साखर कारखाना चालवून दाखविला. एवढंच नाहीतर साखरेला ब्रँडचे रूप दिले. सहकारी साखर कारखानदारीसोबत खासगी साखर कारखान्यांमध्येही मुंडेंनी आपला वेगळा वरचष्मा कायम राखला आहे. पानगावचा पन्नगेश्वर, लिंबा गावचा योगेश्वरी, अशी या परिसरात खासगी तत्त्वावरील कारखानेदेखील उत्तमरीतीने चालविले आहेत. वैद्यनाथ कारखान्याने एक-दोन साखर कारखान्यांना भाडेतत्त्वावर चालवायलादेखील घेतले आहे. हे त्यांच्या साखर कारखानदारीचे यश आहे.
राजकीय कर्तृत्व
युती सरकारने घेतलेले महत्त्वाचे लोकप्रियतेचे निर्णय : -वेळेचा कोणताही मुलाहिजा न बाळगणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना वक्तशीरपणाची शिस्त लावण्याचा प्रयत्न. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास योजना. गरिबांना स्वस्त खाणे मिळण्यासाठी झुणका-भाकर केंद्र योजना. गरिबांना स्वस्त खाणे मिळण्याबरोबरच झुणका-भाकर केंद्रांसाठी मोक्याच्या जागा अर्थात रोजगाराचे हक्काचे नवे साधन मिळाले होते. कुटुंबप्रमुखाचे आकस्मिक निधन झाल्यास त्याच्या परिवाराला २५ हजार रुपयांची मदत करण्यासाठी जिजामाता महिला आधार विमा योजना. बेघरांना घरबांधणीसाठी दहा हजार रुपये. शेतकऱ्यांसाठी बळीराजा संरक्षण विमा योजना. मुंबईत ५५ उड्डाणपुलांची योजना. युतीच्या चार वर्षांत ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा,’ ही कल्पना राबवली होती.याच वाटेवरून रस्तेबांधणी, वीज निर्मिती, पाटबंधारे या क्षेत्रांत खाजगी क्षेत्रांचा सहभाग घेण्याचा पुकारा ठामपणे केला. कृष्णा खोरे विकास मंडळ स्थापन करून कृष्णा खोरे प्रकल्पाला खुल्या बाजारातून पैसा उभा केला. पंढरपूरला वारकऱ्यांना जाण्यासाठी पन्नास टक्के एस.टी. प्रवासात सुट दिली होती. शिवाय देहू, आळंदी व पंढरपूरला वारकऱ्यांना जाण्यासाठी धर्तीवर विकास कामासाठी करोडो रूपये दिले. भाजप-सेनेच्या युतीसरकारच्या शासनाच्या कालावधीतील मुंडे यांची यशस्वी कारकिर्द विलक्षण प्रभावी व यशस्वी ठरली.राज्यातील कायदा सुव्यवस्था सलोखा कायम ठेवण्यासाठी त्यांना अनेक धर्मसंकटंना सामोरे जावे लागले.गृहमंत्री पदावर असतांना त्यांनी राज्यातील पोलिसांचे मनोधैर्य वाढविले. कुप्रसिद्ध गुंडांना कंठस्नान घातले. पोलिस तेच आहे बदलला होता गृहमंत्री व त्यांनी दिलेला आत्मविश्वास गर्दीत लोकप्रिय असणारा नेता, धाडसी अधिकारी वर्गात लोकप्रिय झाला हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. भाजप-सेनेच्या युतीसरकारच्या काळात कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याची नोंद झालीच पाहिजे असा आदेशच तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी दिला होता. भाजप-सेनेच्या युतीसरकारच्या सत्तेच्या काळात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना समाजातील विविध अडचणी सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळेस मुंबईची कायदा सुव्यवस्था कमालीची खालावलेली होती. दिवसा ढवळ्या रस्त्यावर टोळीयुद्ध सुरु झाले होते. मुंडे यांनी पोलिसांना आदेश दिला, ‘गोळीचा मुकाबला गोळीने करा’, परिणामी मुंबईतील टोळीयुद्ध आटोक्यात आले. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री असताना गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले मुंडे म्हणजे गुंडाच्या टोल्याना ते धनाजी संताजी वाटत. समाजातील वाईट प्रवृत्तीविरुद्ध संघर्ष करणे ही त्यांची खासियत. एक नेता म्हणून त्यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प सुरू केले.
साखर सम्राट गोपीनाथ मुंडे
राज्यात साखर कारखनदारी अधोगतीला जात असताना मुंडे यांनी स्वतः साखर कारखाना उभारून अतिशय कमी खर्चात काटकसर करून आदर्श दाखविला. तसेच दुसरा तोट्यात, बंद स्थितीत चाललेला कॉँग्रेस नेत्यांचा गोदा-दुधना साखर कारखाना स्वता:च्या ताब्यात घेऊन योग्य नियंत्रणामुळे उर्जितावस्थेत आणला. मुंडे यांनी उसापासून इथेनॉल निर्मितिचा प्रकल्प उभारून उस उत्पदकंणा जास्त भाव मिळण्याच्या दृष्टीने आणखी एक नवे पाउल टाकले. गोपीनाथ मुंडे…ऊसतोड कामगाराचे नेते म्हणून नेहमी आपली ओळख करून देणारे आणि ऊसतोड कामगारांचे नेतृत्त्व करणारे मुंडे कधी साखर सम्राट झाले हे कळलेच नाही. राज्यात मुंडेंऩी २६ साखर कारखाने उभे केलेले आहेत. तसेच राज्यातील एकूण कारखान्यांपैकी पन्नास ते साठ कारखाने मुंडेंसमर्थकाकडे आहेत. महाराष्ट्राचा मानबिंदू असलेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबईतील उड्डाणपुलांचे जाळे हे युतीचे सरकारचे यश होते. अवसायानात गेलेले साखर कारखाने, वीज निर्मिती प्रकल्प असे नवनवीन उपक्रम त्यांनी हाती घेतले आणि यशस्वी करत आपले नेतृत्व गुण सिद्ध केले. मुंडे यांनी गेल्या काही वर्षांत साखर कारखाना आणि शिक्षण संस्था उभारल्या आहेत. भाजप-सेनेच्या युतीसरकारच्या काळात इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या कालखंडांदरम्यान तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते पैठणचे सुपुत्र व इतिहास संशोधक बाळासाहेब पाटील पुराण वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन झाले. मुंडे यांनी युती शासनाच्या काळात उपमुख्यमंत्री असताना करमाळा तालुक्यातील कुकडी प्रकल्पाचे व उजनीच्या दहिगाव सिंचन योजनेचे काम मंजूर केले. भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबाद येथे प्रोझोन मॉलवर प्रस्तावित आंतरराष्ट्रीय चार मजली ‘प्रोझोन ट्रेड सेंटर’ चा पाया रचला. व्हीनस कल्चरलतर्फे संगीत क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा ‘संत ज्ञानेश्वर’ पुरस्कार त्या वर्षी प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांना प्रदान करण्यात आला; गोरेगाव येथे महाराष्ट्र दिनी झालेल्या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांना प्रदान करण्यात आला. खेबुडकरांच्या कन्या कविता पडळीकर यांनी पुरस्कार स्वीकारला. तेव्हा कोल्हापुरात असलेले खेबुडकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाहीत. पुरस्काराबद्दल कळविल्यानंतर खेबुडकरांनी हा सन्मान गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते व्हावा अशी इच्छा व्यक्त केल्याचे व्हीनस कल्चरलतर्फे रमेश मेढेकर यांनी सांगितले होते. अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम सुरू : २०११-१२ मध्ये भूसंपादन प्रक्रियेला गती मिळाली आणि भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे. या कामाची मागणी लोकसभेतील भाजप उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. भाजपचे उपनेते बीड जिल्ह्याचे खा.गोपीनाथ मुंडे हे संसदेत या मार्गासाठी चांगली तरतुद व्हावी यासाठी प्रयत्नशील होते. या सगळ्या प्रयत्नातून जिल्ह्याच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला चालना मिळेल आणि हा रेल्वेचा प्रश्न मागीर् लागण्यासाठी मदत होणार आहे. मराठवाड्यातील रेल्वेच्या विकासासाठी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी रेल्वे मंत्रालयाकडं ६०० कोटी रूपयाची मागणी केली. या प्रश्नाची दखल घेतल्याबद्दल मराठवाडा जनता विकास परिषदेने त्यांचे अभिनंदन केले. मराठवाड्यातील खासदार रेल्वेच्या प्रश्नाकडं लक्ष देत नाहीत पण मुंडेंनी हा प्रश्न लावून धरला असं परिषद सांगते.
माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीला गोपीनाथ मुंडे यांनी कडाडून विरोध केला. आणीबाणीच्या वेळी त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. गोपीनाथ मुंडे म्हणजे चळवळीचा अखंड स्नेत होता. विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे यांची प्रमोद महाजन यांच्यावर अपार निष्ठा होती. आणीबाणीनंतर गोपीनाथ मुंडे यांनी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आमदार- खासदार होऊन परंतु सत्तेच्या बाहेर राहून साखर कामगारांसाठी प्रचंड योगदान दिले. स्वातंर्त्योत्तर काळापासून साथी गोपीनाथ मुंडे आणि महाराष्ट्रातील साखर कारखाना कामगार हे समीकरणच होऊन बसले होते. महाराष्ट्रात साखर कारखाना कामगारांची संघटना सर्वप्रथम गोपीनाथ मुंडे यांनीच बांधली आणि गेली चाळीस वर्षे त्यांनी या कामगारांचे अव्याहतपणे नेतृत्व केले. साखर कामगारांना संघटित करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी कामगारांच्या न्यायहक्कासाठी वेळोवेळी साखरसम्राटांशी आंदोलनाच्या माध्यमातून लढा दिला. त्यांनी स्वतःला चळवळीत झोकून दिले. ते अखेरपर्यंत त्यांच्या विचारावर ठाम राहिले. अग्रभागी असायचे. कामगारांचे नेते अशीच त्यांची कायम ओळख राहिली. गोपीनाथ मुंडे अखंड कार्यरत असायचे. गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीमागे केवळ जनसंघ नाही, तर या परिवाराच्या परिघापलीकडे जाऊन त्यांनी अनेक माणसे आणि गट आपल्याशी घट्टपणे जोडून ठेवले होते. मुख्य म्हणजे इतर मागासवर्गीय समाज हा त्यांच्यासोबत होता. इतर मागासवर्गीयांची जनगणना ही जातीच्या आधाराने व्हावी, ही मागणी मुंडे यांनी संघाचा विरोध असतानाही लावून धरली. मंडल आयोगाच्या वेळी देशभरातील भाजप आणि महाराष्ट्रातील मित्रपक्ष शिवसेना मंडलच्या विरोधात असताना मुंडे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र भाजपने मंडलला समर्थनाची भूमिका घेतली होती. ओबीसी मुस्लिमांना आरक्षण द्यायला समर्थनाची भूमिका मुंडेनी घेतली होती. त्यांनी ओबीसी मुस्लिमांनाही आरक्षण मिळावं अशी मागणी ओबीसी मुस्लिम परिषदेत केली होती. बीड येथे मराठा सेवा संघाच्या अधिवेशनात बोलताना भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष करायला तयार आहोत अशी घोषणा केली. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला विरोध नाही असे आश्वासन दिले. अंबाजोगाईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या योगेश्वरी देवीचे चोरी गेलेले दागिने लोकनिधीतून पुन्हा तयार करण्यासाठी शहरवासीयांची खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मदतफेरी काढण्यात आली. बीड जिल्ह्य़ात इ.स. १९७२ पेक्षा भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना राज्यातील आघाडी सरकारने मात्र दुष्काळी जिल्ह्य़ांत बीडचासमावेश केला नाही. पश्चिम महाराष्ट्राला तुपाशी खाऊ घालणाऱ्या व दुष्काळी परिस्थितीतही भेदभाव करणाऱ्या आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी आणि बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ७ मे इ.स. २०१२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुकयातील आंदोलनात तीन शेतकऱ्यांचा बळी गेल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. तेव्हाच्या तापलेल्या वातावरणात गोपीनाथ मुंडेनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात दौरा केला. गोपीनाथ मुंडे यांनी मावळात भेट देऊन गोळीबारातील मृतांचे सांत्वन केले. तळेगाव येथील शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्या आंदोलकांचीही त्यांनी विचारपूस केली. पावसाळ्यात गोदावरीच्या पुराने मराठवाड्यात प्रचंड नुकसान झाले. त्या कठिण परिस्थितीत मुंडे मतदीसाठी धावून गेले. त्यांनी संपूर्ण भाग पायदळी तुडवत ‘गोदा परिक्रमा’ केली. लोकांचे सुखदु:ख जाणून घेतले, त्यांच्या पाठीवर सहानुभूतीचा हात फिरवला, सरकारचे लक्ष वेधले.
संक्षिप्त परिचय
इ.स. १९६९: बीडच्या कॉलेजमध्ये विद्यार्थीसंसदेच्या पहिल्या वर्षी वर्गप्रतिनिधीची(सीआर) निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
इ.स. १९७०: परळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अ. भा. वि. प.) काम.
इ.स. १९७८: महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत पराभव.
इ.स. १९७८: बीड जिल्हापरिषद निवडणुकीत रेणापूर (उजनी) मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी.
इ.स. १९८०: महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९८० ते इ.स. १९८५)
इ.स. १९८०: महाराष्ट्र राज्य भारतीय जनता युवा मोर्चाचे पहिले अध्यक्ष.
इ.स. १९८२ : महाराष्ट्र राज्य भाजपचे सरचिटणीस.
इ.स. १९८५: महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर(गेवराई) मतदारसंघातून पराभव.
इ.स. १९८५: बीड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत पराभव.
इ.स. १९८६: महाराष्ट्र राज्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष.
इ.स. १९८७: कर्जमुक्ती मोर्चा: महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोठा मोर्चा काढून शासनास कर्जमुक्ती करण्यास भाग पाडले.
इ.स. १९९०: महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९९० ते इ.स. १९९५).
इ.स. १९९२, १२ डिसेंबर: महाराष्ट्र राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद. (इ.स. १९९२ ते इ.स. १९९५).
इ.स. १९९२: संघर्ष मोर्चा: महाराष्ट्रात राजकारणाच्या गुन्हेगारीकरण विरोधात शिवनेरी ते शिवतीर्थ अशी संघर्ष यात्रा काढली.
इ.स. १९९५: महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९९५ते इ.स. १९९९).
इ.स. १९९५,१४ मार्च : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ (इ.स. १९९५ ते इ.स. १९९९).
इ.स. १९९५,१४ मार्च: महाराष्ट्राचे ऊर्जा व गृहखात्यांचे मंत्री म्हणून शपथ (इ.स. १९९५ ते इ.स. १९९९).
इ.स. १९९९: महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९९९ ते इ.स. २००४).
इ.स. २००४: महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले (इ.स. २००४ ते इ.स. २००९).
इ.स. २००९: बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले (इ.स. २००९ ते इ.स. २०१४)
इ.स. २००९,११ जूलै: महाराष्ट्र राज्य भाजपचे प्रभारी म्हणून नेमणूक.
इ.स. २००९: लोकसभेतील भाजपचे उपनेते म्हणून नेमणूक.
इ.स. २०१०: जनगणनेत ओबीसींची वेगळी नोंद करावी अशी मागणी लोकसभेतील भाजप उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.
इ.स. २०११, १४ मार्च: माफिया राज हटवा मोर्चा: भाजपतर्फे मुंबईत काढण्यात येणाऱ्या माफिया राज हटवा मोर्चा जनजागरण अभियानचे नेतृत्व.
इ.स. २०११, ०३ ऑक्टोबर: निर्धार मोर्चा: बीडमध्ये ऊसतोडणी वाढवून मिळवुनसाठी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला.
इ.स. २०११: जनलोकपाल विधेयकावर अण्णांना पाठिंबा.
इ.स. २०१२: गोवा विधानसभा निवडणूक २०१२ च्या प्रचारासाठी गोव्यात पाठविले.
इ.स. २०१२: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१२ च्या प्रचारासाठी भाजपतर्फे ‘स्टार प्रचारक’ करण्यात आले आहे.
इ.स. २०१२, २७ जून: संयुक्त राष्ट्राच्या ६५ व्या सर्वसाधारण सभेत आंतरराष्ट्रीय कायदा आयोग या विषयावर न्यूयॉर्क येथे भारत सरकारचे प्रतिनिधित्व.
इ.स. २०१२: महाराष्ट्राच्या राज्यात दुष्काळी ठिकाणी दौऱ्यावर निघाले.
इ.स. २०१३: भाजपचे केंद्रीय निवडणूक समितीत समावेश.
इ.स. २०१४: खासदार म्हणून लोकसभेत निवडून आले. केंद्रीय मंत्री म्हणून मोदी मंत्रीमंडळात निवड.
इ.स. २०१४: ३ जून २०१४ रोजी नवी दिल्ली येथे रस्ते अपघातात निधन.
संदर्भ: http://www.gopinathraomunde.com
COPYRIGHT © 2025
Designed with by Website Developer Pune - (A Marttalk Company)